Monday, February 7, 2011

मराठी लोकशाहीर -विठ्ठल उमप

विठ्ठल उमप 
   मुंबईला उदरनिर्वाहासाठी आलेल्या उमप यांनी कामगार वस्तीत मेळ्यातून कामे केली. विठ्ठल उमप हे लोकशाहीर असले तरी त्यांना ‘ कवाल’ म्हणूनच लोक पूर्वी ओळखत. पण नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून, एक समर्थ लोककलावंत, अशी आपली ओळख निर्माण केली. लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता. ‘ आला कागुद कारभारणीचा ’ ही लावणी, ‘ ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात ’ , ‘ भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी ’ , ‘ माझ्या आईचा गोंधळ ’ , ‘ आईचा जोगवा ’ , ‘ आरती श्रीगणेशा जगदीशा ’ , ‘ वादळ वारा तुफान येऊ द्या ’ , ‘ ये दादा आवर रे ’ , ‘ फाटकी नोट मना घेवाची नाय ’ , ‘ भाता मीठ नही टाक्या ’ अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. ‘ माझी मैना गावाकडं राह्यली ’ या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले. १९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता. उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. ‘ अरे रे संसार ’ , ‘ अबक दुबक ’ , ‘ विठो रखुमाय ’ , ‘ खंडोबाचं लगीन ’ , ‘ जांभुळाख्यान ’ या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच ‘ हैदोस ’ , ‘ बुद्धम्‌ शरणम्‌ ’ सारखी नाटके त्यांनी वर्ज्य मानली नाहीत.
लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. अलीकडच्या काळात विहीर, टिंग्या या चित्रपटांमध्येही विठ्ठल उमप यांनी छोटेखानी भूमिका साकारल्या. लवकरच प्रदर्शित होणा-या गजेंद्र अहिरे यांच्या ‘ सुंबरान’ या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडतं. विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे मराठी लोककलेची, रंगभूमीचं मोठं नुकसान झाल्याची भावना सांस्कृतिक वर्तुळात व्यक्त होतेय. संपूर्ण आयुष्य समाजासाठी जगलेल्या या शाहिरानं शेवटचा श्वासही एका सामाजिक कार्यक्रमातच घ्यावा, हा योगायोगच म्हणावा लागेल. आता त्यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश यांच्यावर आहे.विठ्ठल उमप हे नाव घेतले की डोळ्यापुढे येते ते ' जांभुळ आख्यान ' या लोकनाट्यातल्या त्यांच्या बेहतरीन अदाकारी. एकदा मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात त्यांनी ' जांभुळ आख्यान ' सादर केले तेव्हा प्रयोग संपल्यानंतर मंत्रमुग्ध झालेले विक्रम गोखले प्रेक्षकांतून आले आणि त्यांच्या पाया पडले. भल्याभल्यांनी अचंबित व्हावे अशी त्यांची ती द्रौपदी होती. या भूमिकेसाठी त्यांना म. टा. सन्मान पुरस्कार मिळाला. इथवर पोचायला त्यांना वयाची पंच्याहत्तरी गाठावी लागली. त्यांना बालवयात काय काय करावे लागले नाही ? त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी चणेफुटाणे विकले , हमाली केली , पडेल ते काम स्वीकारले. जन्मजात दारिद्र्यावर अनेकांनी मात केली. एका दलित कुटुंबात जन्म झाल्याने त्यांच्या वाट्याला संघर्ष अटळ होता. इतरांना किमान सामाजिक प्रतिष्ठा होती , तीही उमपांच्या वाट्याला आली नाही. तरीही आपल्यातल्या सुप्त कलागुणांची कस्तुरी जेव्हा त्यांना सापडली तेव्हा त्यांनी या कलासागरात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्यातल्या उत्तुंग अभिनय गुणांनी त्यांनी लोककलेला जगाच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. उमपांचे वैशिष्ट्य असे की ते कवीही आहेत , संगीतकार आणि अभिनेतेही. त्यांनी अनेक गजल , कविता , गीते आणि पोवाडे लिहिले आहेत. या बिगरकोळ्याने ' ये दादा हावर ये ' म्हणत कोळी गीतांच्या ध्वनिमुदिका लोकप्रिय केल्या. आकाश-वाणीवरून हजारो गीते पेश केली. गोंधळ , भारुड , जागरण घालावे ते विठ्ठलदादांनीच. ' फू बाई फू ' गाताना किंवा ' कृष्णा थमाल रे ' पेश करताना ते गाणे असे काही रंगवत नेतात की अर्धा अर्धा तास श्रोता हलत नसे. १९८३ साली आयर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात उमपांनी भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. रंगभूमीच्या मुख्य धारेत त्यांनी ' अबक दुभक तिभक ', ' खंडोबाचं लगीन ', ' बया दार उघड ' अशी नाटके गाजवली. अनेक अपमान , अवहेलना सोसतानाही चेहऱ्यावरचे हसू न हरवलेल्या या कलावंताने अनेक मान-सन्मानही मिळवले आणि आपले श्रेष्ठत्व सिध्द केले. वामनदादा कर्डक , कृष्णा शिंदे , माशेलकर , पोवळे या पिढीतल्या उमप यांनी कव्वालीचे जंगी सामने गाजविले. संत तुकडोजी महाराजांच्या परंपरेचे एकतारी , दिमडीवरचे भजन , नाथांची भारूडे , उर्दू शायरी , जानपद गीते , पाळणे , पोवाडे , कोळीगीते अशा विविध प्रकारचे गायन व काव्यलेखनही उमप यांनी केले. म्हणूनच शाहीर फक्त शाहीर राहीले नाहीत तर ख-या अर्थाने लोककलेचा ' विठ्ठल ' ठरले.कव्वाली असो वा अभंग...कोळीगीत असो वा लावणी...कलेच्या सर्व प्रांतात मुक्त संचार करणारे, परंपरा आणि नवता यांचा सुरेख आणि सुरेल संगम असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकशाहीर, ‘ जांभूळ आख्यान ’ कार विठ्ठल उमप यांचं शनिवार  २७ नोहेम्बेर २०१० रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नागपुरात दीक्षाभूमीजवळ एका दूरचित्रवाहिनीचं लाँचिंग विठ्ठल उमप यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होतं. त्यावेळी गौतम बुद्धांच्या मूर्तीला शाहिरांनी वाकून प्रणाम केला आणि विराट जनसागरासमोर ‘ जय भीम ’ चा जोरदार नारा दिला. तेव्हाच चक्कर येऊन ते व्यासपीठावर कोसळले. हे दृश्य पाहून सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं. शाहिरांना तातडीनं उपचारासाठी नेण्यात आलं, पण तोवर त्यांची प्राणज्योत मालवली